Amar Bansi 2018 US Tour - Reviews

Jain Temple Milpitas San Jose.

A soulful musical journey of melodies, arranged by Natya Sargam! What a joy to be the Master of Ceremony for this brilliant concert with talented artists! Thanks Natya Sargam team for the awesome opportunity!

Maharashtra Mandal of Detroit (mmdet.org)
अमरबन्सी: हवाहवासा पावा
शांताबाईं शेळकेंचा श्रीकृष्ण ‘अलवार वाजवित वेणू’ आला आणि अमर ओकची बासरी ऐकत बसला .....
त्या बन्सीधराच्या संगीताने गोप व गोपी मोहावून जात, गुरे सुद्धा त्याच्या भोवती जमा होत म्हणे. आम्हाला त्याचा प्रत्यय शनिवारी संध्याकाळी आला. अमरच्या बासरीने अलगद पिसारा फिरवला आणि वातावरण प्रसन्न झाले. डेट्रॉईटच्या मराठी मंडळाने 'अमर बन्सी' हा कार्यक्रम ठेवून पुन्हा एकदा षटकार मारला! आबालवृद्धांना परिचित असलेल्या ‘सूर निरागस हो’ या दमदार गीताने बासरीवादनाला सुरूवात झाली, विनायक जोशी, अनय गाडगीळ आणि रोहन वनगे यांनी आपापली अस्त्र - नव्हे वाद्यें - सरसावली आणि पुढचे अडीच तास आम्ही सुरांत न्हाऊन निघालो.
'गीतम्, नृत्यम् तथा नाट्यम्, संगीतम् त्रयमुच्च्यते' असं संगीताबद्दल म्हंटलं जातं. त्या वर्णनात खरं तर 'तथा वाद्यम्' याची भर घातली पाहिजे. आपण साथीच्या वाद्यांशिवाय गाण्याची कल्पनाच करू शकत नाही तरीही पूर्वी ती सर्व वाद्यें पार्श्वभूमीवर दुय्यम स्थानावर असत. गेल्या काही दशकांत मात्र साथीच्या वाद्यांची आघाडी आहे आणि त्या वाटेवरचा, ज्याला मानाचा मुजरा करावा असा शिलेदार म्हणजे 'अमर ओक'. त्याच्यासकट चार सर्जनशील मनांनी बांधून वेधक सूरसंगम साधला.
झीच्या ‘सारेगम’तल्या बऱ्याच गाण्यातून पुढे आलेल्या अमरच्या बासरीमध्ये शास्त्रीय संगीताची साधना व दिग्गजांनी केलेले संस्कार दिसून येतात. रागमाला, फ्यूजन, भावगीत, भक्तीगीत, रागांचे पदर उलगडून दाखवणारे अभिनव सादरीकरण त्याने सहजी केले. ‘ही वाट दूर जाते’, ‘तिन्ही सांजा सखे मिळाल्या’, ही गाणी ऐकताना बासरीच्या सुरावटींमागील शास्त्र आणि सौंदर्य उलगडत गेलं. ए आर रेहमान ची गाणी मनातल्या मनात गुणगुणायला सुद्धा कठीण जातात आणि इथे हा पठ्ठा 'तू ही रे, कुच्छी कुच्छी रकमा, दिल है छोटासा' ही गीतमाला लीलया सादर करतो. वादनातील अचूकता, फुंकीवर असणारी कमालीची हुकूमत दिसून येते ती अशी.
“तुम्ही कुठलं गाणं वाजवणार?” ही प्रेक्षकांतून पृच्छा झाल्यावर, “ते आधी सांगणं हा ‘अमरबन्सी’चा पराभव आहे” असं अमरने मिश्किल हसत उत्तर दिलं . परंतू ‘चालीवरून गाणं ओळखा’ हा या प्रयोगाचा उद्देश नव्हताच मुळी. त्याच्या बासरीचे सूर ऐकताना मूळ गीत ओळखता येत तर होतंच पण गीताची गरजही भासत नव्हती; पंचमदांच्या 'मेहबूबा मेहबूबा' या गाण्यातली मादकता आणि 'मोगरा फुलला' या अभंगातील शांतरस तितक्याच ताकदीने आणि उत्कटतेने प्रकट होत होते, 'शब्देविण संगीतू' असा हा अनुभव होता.
फुफ्फुसाचा भाता जेंव्हा बासरीच्या भोकांमधून सुरेला नाद निर्माण करतो तेंव्हा धन्य होतो .... 'वाजले की बारा' या लावणीतला शृंगार आणि 'तुम्हे देखती हो' या गाण्यातील शृंगारिक आर्तता यातला फरक बासरीतून व्यक्त करणारा अमर ओक हा एक किमयागार आहे. गाण्यात गोडवा कुठून येतो? शब्दांतून? सुरांतून? भावातून? या सर्वांचा समसमा संयोग झाला की त्या गाण्याला 'चार चाँद' लागतात. ६ इंच ते ३ फूट लांबींच्या अनेक बासऱ्यांद्वारे त्याने संगीताचं, बासरीचं (आणि नर्म विनोदाने मनुष्यस्वभावाचं) मर्म समजावलं. त्या बासऱ्यांमध्ये केवळ लहान मोठी एवढाच फरक नसून वादनाचा बाज बदलतो हे त्याने तांत्रिक क्लिष्टता आणू न देता छान समजावले legato , staccato, tremelo हे आमच्या मराठी-अमेरिकन मुलांना समजतील असे शब्द वापरून संवाद साधला.
अशा कार्यक्रमात साथ करणं सोपं नाही, मूळ वाद्याचं महत्व कमी न करता, संगीताची गोडी वाढवायची असते. हे आव्हान तबला, ढोलकं (आणि sand paper!) वापरून विनायक जोशी या गुणी कलाकाराने ताकदीने पेलले. अनय गाडगीळ आणि रोहन वनगे या दोघांचीही बोटं गाण्यातली सौन्दर्य स्थळं खुलवत होती.
कार्यक्रमाची सांगता ज्ञानेश्वरीतील 'आजि सोनियाचा दिन' या विराणीने झाली. आमची संध्याकाळ सोनियाची झाली!
- ज्योत्स्ना दिवाडकर (Jyotsna M. Diwadkar)

Swarashruti
एप्रिल २९, २०१८ शिकागोकरांना खूप दिवस लक्षात राहाणार! हॉफमन इस्टेट च्या जलाराम मंदिरात अमर बन्सी चे सूर असे काही रंगले, अवघ्या अडीच तीन तासांत सारे लहान-थोर बन्सीमय होऊन गेले. अमर ओक - बासरी, प्रसाद जोशी - तबला, अनय गाडगीळ - सिन्थ आणि रोहन वानगे - ऑक्टापॅड या केवळ चार कलाकारांनी एक अत्यंत सुरेल, संस्मरणीय अशी मैफिल शिकागोकारांसमोर सादर केली. बासरी या वाद्याची संगीतातली, विशेषतः: भारतीय संगीतातली ताकद काय आहे याचा प्रत्यय शिकागोकरांना आला. अतिशय माफक पण माहितीपूर्ण निवेदन करत अमर ओक यांनी रसिकांना बासरी या वाद्याची ओळख करून दिली. त्यांनी सादर केलेली झिंझोटी रागातली आणि खमाज रागातली 'मेडले' रसिकांच्या मनात घर करून गेली. प्रसाद जोशींची तबला साथ समर्पक आणि तरीही स्वतः:ची एक छान ओळख दाखवणारी होती. अनय गाडगीळ आणि रोहन वानगे या युवा कलाकारांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. वेगवेगळ्या फर्माईशी वाजविताना त्यांची साथ ऐकून त्यांच्या तयारीची कल्पना आली. आर. डी. बर्मन दांचे संगीत आणि त्यातले सौंदर्य दाखविताना चक्क सॅण्ड पेपर, बाटली अशा वस्तूंमधून अविस्मरणीय अशी गीते सादर करीत अमर बन्सी ने शिकागो जिंकले असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये. 
मैफिलीचा गाभा बासरी हाच ठेवत बॉलीवूड, हिंदुस्थानी क्लासिकल, मराठी भावसंगीत, भक्तिसंगीत , हिंदी- मराठी सीरिअल्स ची टायटल्स , रहेमान चे संगीत, पहाडी आणि बंगाली धुना हे सर्व ऐकवत अमर ओक यांनी प्रेक्षकांना आपलेसे केले. शिकागोकरांनीही उस्फुर्त नाचून, शिट्या, टाळ्या वाजवून समाधानाची पावती दिली. 
एक खूप छान असा सांगीतिक प्रोग्रॅम दिल्याबद्दल स्वरश्रुती या संस्थेचे खूप खूप आभार आणि असेच जलसे शिकागो मध्ये वारंवार होवोत यासाठी शुभेच्छा!

Baldev Thakor 
April 26 2018· 
*Amar Bansi By Amar Oak*
The unique musical treat in which one gets to enjoy variety of flute flavors ranging from Hindi classics and Krishna Bhajans presented by Amar Oak, a well-known flute player & a household name in the world of music.
I really enjoyed the Bansuri this beautifully played for more than 3 hours.
Thanks 
Charlotte Marathi Mandal and Hindu Center Charlotte.

 Mahesh Lad

Amar Bansi NJ concert ..... speechless ! Thank you Amar Oak for a mesmerizing, soulful, fluteful musical evening!

 

Aparna Padhye

'अमर बन्सी' हा कार्यक्रम शार्लेट मध्ये करायचे ठरले आणि मी विचार करू लागले.नुसत्या बासरी वादनाचा कार्यक्रम ? आणि तो पण ३ तास ? Youtube वरचे व्हिडिओ, आधीच्या कार्यक्रमाचे अभिप्राय बघून सुद्धा या कार्यक्रमाचे स्वरूप नक्की काय असेल याची पूर्ण कल्पना येत नव्हती. पण जसे जसे त्या टीम शी संवाद झाले तसे तसे या कार्यक्रमाचे नावीन्य आणि वेगळेपण जाणवू लागले . त्यामुळे कार्यक्रमाची उत्सुकता खूप वाढली आणि 'अमर बन्सी' ची टीम १८ एप्रिल २०१८ ला शार्लेट मध्ये दाखल झाली. 'अमर बन्सी' चा जनक - अमर ओक , त्या टीम ची जान प्रसाद जोशी आणि दोन जबरदस्त शिलेदार - अनय गाडगीळ आणि रोहन वानगे अमेरिका दौऱ्याचे ३० दिवस संपवून आमच्याकडे आले. २ दिवस राहून त्यांना बॉस्टन ला जाऊन परत यायचे होते. शार्लेट चा प्रयोग ठरल्यानंतर ,त्यांचा बॉस्टन चा प्रयोग ठरल्याने त्यांना हे द्राविडी प्राणायाम करावे लागले. पण कुठेही तक्रार नव्हती कि प्रवासाचा कंटाळा नव्हता . एकमेकांना छान ओळखणाऱ्या ,एकमेकांना समजून घेणाऱ्या आणि मुख्य म्हणजे एकमेकांना सोबत घेऊन चालणाऱ्या ह्या पुणेकर मंडळीनी अगदी थोड्या वेळातच आम्हा सर्वाना आपलेसे केले. 
दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाचे स्थळं बघून , आवाजाची सोय बघून , लागणाऱ्या आवश्यक गोष्टी 'गिटार सेंटर' मध्ये ऑर्डर करून झाले.नंतर ३ दिवस बॉस्टन ला जाऊन कार्यक्रम करून रविवारी सकाळी परत आले. एवढा रोजचा प्रवास,जागरण, इतके असून सुद्धा ते सर्व ताजेतवाने होते आणि कार्यक्रमासाठी उत्सुक होते. अनय, रोहन आणि मंडळाची टीम साऊंड सेटअप करायसाठी लवकर गेले व सर्व नीट सेट केले, त्यामुळे अप्रतिम साऊंड आम्हाला ऐकायला मिळाला.

गांधी भवन मध्ये कार्यक्रम बघण्याची माझी पहिलीच वेळ होती, सगळा सेटअप एकदम छान झाला होता. कार्यक्रम सुरु झाला आणि अमरच्या बासरी वादनाने प्रेक्षक मंत्रमुग्ध व्हायला लागले. नंतर नंतर तर चक्क बासरीचं गाणे म्हणतेय असे वाटायला लागले.
अमर बन्सी चा कन्सेप्ट खूप वेगळा आहे , खूप innovative आहे , याची मांडणी एक्दम वेगळी असून एक जबरदस्त flow त्यात आहे. वेगवेगळ्या गीतकारांची , वेगवेगळ्या कलाकारांची , वेगवेगळ्या काळातली , वेगवेगळ्या गायकांची गाणी,वेगवेगळ्या रागावर आधारलेली गाणी केवळ बासरी वर वाजवून एक वेगळीच वैविध्यता त्यात आणली आहे. पण त्यात सुद्धा एक वेगळीच सहजता आहे , कुठेही continuity ब्रेक न होऊ देता कार्यक्रम फटाफट पुढे सरकत होता . अमर ने मध्ये मध्ये गाण्याबद्दल, वाद्यांबद्दल , आवाजाच्या इफेक्ट बद्दल थोडक्यात सांगितलेली माहिती खूप काही शिकवून जात होती .
एक एक शब्द बासरीच्या सुरांतून स्पष्ट ऐकू येत होता. 'काय बाई सांगू ' हे गाणे वाजवल्यानंतर अतिशय खुमखुमीत शब्दात पुणेकरांवर जोक करीत अमर ने 'गाणे वाजवताना शब्द माहित असणे' किती महत्वाचे आहे हे सांगितले आणि जर शब्दमाहित नसतील तर ते किती यांत्रिक वाटते याचे प्रात्यक्षिक पण दिले.

बासरीवर गाणे चालू झाले की आपोआप सर्व प्रेक्षक टाळ्यांच्या कडकडाट नकळत गाणे गुणगुणायला लागायचे .त्यामुळे त्या हॉल मध्ये एक खूप छान वातावरण निर्माण झाले.शार्लेट चा प्रेक्षक खूप रसिक आहे असे आम्ही अमर ला अभिमानाने सांगितलं होते ,पण त्यादिवशी जे अनुभवायला मिळाले ते अविस्मरणीय होते. गाणे चालू झाले कि टाळ्यांचा कडकडाट आणि गाणे संपले कि स्टँडिंग ओव्हेशन .इतक्या कार्यक्रमात एवढ्या गाण्यांना स्टँडिंग ओव्हेशन मिळताना मी पहिल्यांदाच अनुभवलं .३/४ गाण्यानंतर मी किती गाण्यांना स्टँडिंग ओव्हशन मिळतंय हे मोजणे सोडून दिले. एका गाण्यानंतर अमर ने एवढा मोठा निःश्वास टाकला कि अनय ने विचारले 'थकलास का?' तर अमर म्हणे,' मी थकलो नाही पण हा प्रेक्षकांचा उत्साह आणि रिस्पॉन्स इतका छान आहे कि खूप ओव्हरव्हेलमींग वाटतेय! ' खरेच त्यादिवशी प्रेक्षकांमुळे कलाकारांना आणि कलाकारामुळे प्रेक्षकांना कसा आनंद मिळू शकतो, कशी ऊर्जा मिळू शकते हे खूप जवळून बघायला मिळाले.
लावणी पासून ते भक्ती गीता पर्यंत, देवानंद पासून ते ए आर रहमान पर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे गाणे एका मागून एक सादर होत होते. मी जर गाण्यांची लिस्ट बनवली तर २/३ पानं सुद्धा पुरणार नाहीत , इतकी गाणी सादर झाली त्यादिवशी! अगदी अशक्य वाटणारी हि गोष्ट अमर एखाद्या जादूगारासारखा अगदी सहज स्टेज वर सादर करत होता . त्याच्या बरोबरीने आणि तितक्याच ताकदीने त्याचे सहकलाकार त्याला हि जादू निर्माण करायला मदत करत होते.
अमर ने आणलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या बासरी बद्दल सर्वाना खूप कुतुहूल होते. त्याच्या जवळ अगदी ६ इंचापासून ते २ फुटापर्यंत एकूण ३० बासऱ्या होत्या. खूप थोड्या शब्दात , प्रात्यक्षिक देत अमर ने त्या सर्व बासऱ्यांचा वापर कसा केला जातो हे दाखवून दिले . बासरी बद्दल बोलताना अमर म्हणाला प्रत्येकाने या बासरी सारखे असले पाहिजे . बासरी तयार करताना बांबू कापून आपल्या वंशावळीपासून दूर होते,अलिप्त होते. त्यानंतर ती आतून पोकळ होऊन षडरिपू म्हणजे काम,क्रोध,लोभ,मोह,मद आणि मत्सर हे आपल्या छिद्रातून बाहेर काढते, तसे आपल्याला सुद्धा अलिप्त राहून या षडरिपू ना दूर ठेवून भगवंताशी एकरूप होता आले पाहिजे. बासरीकडे पाहण्याचा हा नवीन दृष्टिकोन मनाला खूप भावाला. आणि लक्षात आले कि अमर सुद्धा त्या बासरी सारखाच ,भगवंताशी एकरूप झालेला , बासरीशी एकरूप झालेला , एकदम निर्मळ , एकदम नम्र , एकदम साधा ! त्याच्या बासरीतून , गाण्यातून प्रेक्षकांना त्याचा निर्मळपणा,त्याची सहजता,त्याची बासरीशी असलेली एकरूपता जाणवत होती .
अमर जसा विनयशील तसेच त्याचे सहकलाकार. प्रत्येक वाद्य महत्वाचे , पण कुठेही कोणामध्ये चढाओढ नव्हती , पण एक परफेक्ट बॅलन्स होता , ज्यामुळे कार्यक्रम अजून रंगला होता. हि सर्वच मंडळी एका वेगळ्याच ध्येयाने झपाटलेली आहेत , एका वेगळ्याच अनाकलनीय बंधनात बांधलेली आहेत ,एकमेकांना पूरक आहेत आणि तरीही स्वतः त्या बासरी सारखी आहेत. या सर्व गोष्टींमुळे त्यांचा कार्यक्रम नुसते गाण्याचे सादरीकरण ना राहता एक वेगळा अनुभव देऊन जातो. अनय चे कीबोर्ड वर , प्रसाद चे तबल्यावर आणि रोहन चे octapad वर अतिशय सुंदर सोलो प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरले.अनय ने वाजवलेला समुद्राच्या लाटांचा आवाज , प्रसाद ने सॅण्ड पेपर ने वाजवलेला ट्रेन चा आवाज सगळ्यांना आश्चर्य चकित करून केला.
मध्यंतरानंतर फर्माइशींचा कार्यक्रम झाला , पानेच्या पाने होते फर्माइशींची , पण अमर ने ना थकता जेवढी जमतील तेवढी , एकामागे एक सादर केली. इतकी विविधता ,इतकी सकारात्मक ऊर्जा, इतके synchronization , इतका उत्साह , इतके टॅलेंट , इतके प्रेम, इतकी आपुलकी अनुभवायला मिळाली कि ते शब्दात वर्णन नाही करता येत .एवढ्या फर्माईशी पूर्ण करताना मी आतापर्यंतच्या कुठल्याच कार्यक्रमात बघितले नव्हते. हा कार्यक्रम संपूच नये असे वाटत होते , जवळ जवळ ४ तास वाजवल्यावर मग शेवटाकडे वळून अमर ने 'अजि सोनियाचा दिनू' या गाण्याने शेवट केला.
कुठलाही कार्यक्रम करायचा म्हटले कि 'TEAM' (Together Everyone Achieves More ) लागते आणि या कार्यक्रमात 'अमर बन्सी ' ची एक टीम आणि शार्लेट मराठी मंडळाची दुसरी टीम यांनी सहजतेने एकत्र काम करत एक वेगळाच अनुभव प्रेक्षकांना दिला.
अमर, प्रसाद, अनय आणि रोहन , तुम्ही शार्लेट ला येऊन तुमच्या वाद्यांनी आम्हा रसिकांना जो आनंद दिलात त्याबद्दल शतश: धन्यवाद !!
अमर बन्सी चा हा २२१ वा कार्यक्रम आम्हा शार्लेटकरांच्या कायम स्मरणात राहील. 'अमर बन्सी' अजरामर होवो व हा कार्यक्रम केवळ मराठी लोकांमध्ये मर्यादित न राहता सर्व भारतीयांपर्यंत पोहोचो यासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा आणि सदिच्छा !!

 

 


© www.amaroak.com
Developed By : Mandar Vaidya